अहमदनगर: भाजपाचे नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधींची भेट घेतली. सुजय यांना उमेदवारी मिळाल्यानं दिलीप गांधी नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी गांधींची भेट घेतली. यावेळी सुजय यांच्याकडून निवडणुकीत मदत करण्याची विनंती करण्यात आली. दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिलीप गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुजय यांनी गांधींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिलीप गांधींना तिकीट नाकारल्यानं त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधींनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता विखे पाटील पितापुत्रांनी दिलीप गांधींची भेट घेतल्यानं नगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होतील, अशी चर्चा आहे. सुवेंद्र गांधी निवडणूक लढवण्याची घोषणा मागे घेतील, दिलीप गांधी सुजय यांचा प्रचार करतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधींची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं. या भेटीत राजकारणावर चर्चा न झाल्याचं त्यांनी सांगितलं. आपण नगरमध्ये राष्ट्रवादीचं काम करणार नसल्याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला. नगरमध्ये सुजय विखेंसमोर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचं आव्हान आहे. सुजय विखे नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र राष्ट्रवादीनं ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे सुजय यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपानं विद्यमान खासदार दिलीप गांधींचं तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी दिली.
दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यात सुजय विखेंना यश? बंद खोलीत अर्धा तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:05 IST