LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 20:36 IST2021-03-15T20:36:05+5:302021-03-15T20:36:42+5:30
Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला
एमआयएम पक्ष भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप वारंवार केला जातो. बिहार निवडणुकीवेळीही 'एमआयएम'मुळे भाजपला फायदा झाल्याचा दावा केला गेला. याबाबत 'एमआयएम' पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला सडेतोड प्रत्त्युतर दिलं आहे. "बिहार निवडणुकीत ३०० जागांपैकी जर आम्ही २० जागी जरी निवडणूक लढवली नाही. मग कसं चालेल? आमचा राजकीय पक्ष आहे. मग आम्ही काय फक्त भाषणं करायची आणि निवडणूक लढवायची नाही का? आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?", असा टोला इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात बोलत होते.
"नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होतो तिथं कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायला हवं म्हणून एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचं म्हणायचं आणि जबाबदारी झटकायची. कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं म्हणून हे असले खोटे आरोप केले जातात. जिथं पराभूत झाले तिथं लगेच काँग्रेसवाल्यांना औवेसी दिसतात आणि त्यामुळं पराभूत झालो असं म्हणतात", असं इम्तियाज जलील म्हणाले.
भाजपला पराभूत करण्यासाठी कुणासोबतही युती करू
अमरावतीत शिवसेनेसोबत केलेल्या युतीबाबतही इम्तियाज जलील यांनी यावेळी मोठं भाष्य केलं. "शिवसेनेसोबत आमची युती झालीय किंवा त्यांची विचारसरणाशी आम्ही जुळवून घेतलंय असं नाही. पण प्रत्येक निवडणुकीत काही स्थानिक राजकीय गणितं महत्वाची असतात. त्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि देशाला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे", असं इम्तियाज जलील म्हणाले.