राज्यात आघाडी, तरी मुंबईत सर्व जागा लढविण्याची तयारी - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:48 IST2020-12-26T05:31:53+5:302020-12-26T06:48:45+5:30
Bhai Jagtap : जगताप यांनी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्यासमवेत शुक्रवारी विविध महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊन पुष्पांजली वाहिली.

राज्यात आघाडी, तरी मुंबईत सर्व जागा लढविण्याची तयारी - भाई जगताप
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. मुंबईतील प्रत्येक वाॅर्डातील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्व २२७ वाॅर्डांत तयारी करायची असल्याचे नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
जगताप यांनी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्यासमवेत शुक्रवारी विविध महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊन पुष्पांजली वाहिली. तसेच सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्ग्यातील मगदूम शाह बाबांचे दर्शन घेतले. माहीम चर्चमध्येही गेले.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, थोर महापुरुषांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन अभिवादन केल्यावर नेहमीच प्रेरणा, ऊर्जा मिळते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून कामाची नव्या जोमाने सुरुवात करताना हीच प्रेरणा, ऊर्जा कामी येईल. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हीच ऊर्जा पोहोचवायची आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईतील सर्व २२७ वॉर्डमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्हाला करायचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, हा भावनिक, गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरोगामी महाराष्ट्रात या मुद्द्यावरून तेढ निर्माण करू नये.