"...तर खपवून घेतले जाणार नाही"; संजय राऊतांविरोधात भूषणसिंह राजे होळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 22:16 IST2021-05-10T22:14:26+5:302021-05-10T22:16:25+5:30
आता या संतापाची दखल घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

"...तर खपवून घेतले जाणार नाही"; संजय राऊतांविरोधात भूषणसिंह राजे होळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. राऊत यांनी ममता बॅनर्जींची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याने धनगर समाजात संतापाची लाट पसरली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा समाजातून निषेध करण्यात येत आहे.
आता या संतापाची दखल घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा आपल्या मुखपत्रातील लेख वाचला. ज्यापद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्याचसोबत रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या आजच्या युगातील एका नेत्याशी कधीच होऊ शकत नाही. आधी अहिल्या मासाहेबांचे विचार आचरणात आणा, त्यांच्या सारखा रयतेचा सांभाळ करा मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही अशी खरमरीत टीका भूषणसिंह राजे होळकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
गोपीचंद पडळकरांनीही केली टीका
आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जींची केली आहे. किंबहुना उद्या हे भाजपासोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या मामुची तुलना सूर्याजी पिसाळ सोबत करतीलच वहिनी यांच्याकडे लक्ष ठेवा असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!@BJP4Maharashtrapic.twitter.com/cz1GJcqn1R
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 10, 2021
संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?
ममता बँनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल. होळकरांच्या गादीला वारसच नसल्याने स्वत: राजशकट हाती घेतले. ही विधवाबाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळीची अटकळ होती.