“एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 09:54 AM2021-02-03T09:54:21+5:302021-02-03T09:57:30+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मनसेला याचा फटका बसू शकतो

It is certain that MNS will succeed in Kalyan-Dombivali under the leadership of Raju Patil | “एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

“एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

Next
ठळक मुद्देकोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतोराजेश कदम यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर मंदार हळबेंनी भाजपाची वाट धरली.आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांपूर्वी स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. मनसेचे डोंबिवलीतील दोन मोठे नेते पक्ष सोडून गेल्याने मनसेला जबर धक्का बसला आहे. मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम आणि गटनेते मंदार हळबे यांच्या जाण्याने निवडणुकीपर्वीच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजेश कदम यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर मंदार हळबेंनी भाजपाची वाट धरली.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मनसेला याचा फटका बसू शकतो, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली, त्यानंतर २४ तासांत डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करत राज ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली मनसेसाठी पोषक वातावरण असलेला भाग आहे. याठिकाणी मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले.

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत २०१३ मध्ये मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, तर २०१७ मध्ये या निवडणुकीत मनसेचे १० नगरसेवक निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला याठिकाणी चांगले मतदान झाले, कल्याण ग्रामीण मतदारसंघाची जागा मनसेने खेचून आणली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसेने कंबर कसली आहे. आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. तत्पूर्वी शिवसेना-भाजपाने मनसेचे २ मोहरे हिरावून त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.

यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे, नांदगावकर म्हणाले की, कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठे पक्षांतर अनुभवले आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवली मध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही, तसेच जनता सगळे जाणून आहे व आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे, पण आमचा एक आहे पण "नेक" आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती की, अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: It is certain that MNS will succeed in Kalyan-Dombivali under the leadership of Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.