If GST fails, Modi should apologize; Uddhav Thackeray removes 'mask' and slaps BJP | जीएसटी फेल गेली तर मोदींनी माफी मागावी; उद्धव ठाकरेंनी 'मास्क' काढून भाजपाला फटकारले

जीएसटी फेल गेली तर मोदींनी माफी मागावी; उद्धव ठाकरेंनी 'मास्क' काढून भाजपाला फटकारले

मुंबई : सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेल गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच त्यांनी मी मुख्यमंत्री पदाचे मास्क काढून बोलणार असल्याचे ते म्हणाले. 


आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेल गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 


मुंबई हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे म्हणणार रावण आला आहे, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे आणि नमकहरामी करायची. मुंबई पोलीस निकम्मे आहेत, चरस गांजा उघड उघड विकला जातो, असे सगळे चित्र उभे केले गेले. त्यांना सांगतो महाराष्ट्राच्या घराघरात तुळशीचे वृंदावन आहे, गांजाचे नाही, असा टोला ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी लगावला. तसेच मुंबई पोलिसांवर केलेले आरोप मी का खपवून घेऊ, मुंबई पोलिसही माझे कुटुंबीय आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे, असे बोलणे हा मोदींचा अपमान आहे. कारण त्यांनीच सांगितलेले की पाच वर्षांत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू अशी घोषणा केली होती, असा टोलाही त्यांनी हाणला. 


एकाने आत्महत्या केली तो लगेच बिहारचा पूत्र झाला. महाराष्ट्र, पोलीस आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते शेण गप गिळायचे आणि शांत बसायचे, असा इशारा ठाकरे यांनी दिला. तसेच तुमच्या धोतराला गोमूत्र आणि शेणाचा वास येतोय त्याला आम्ही काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांत आहोत, पण शंढ नाही. सभ्यतेने वागाल तर आम्हीही तसेच वागू. तलवारीने युद्ध जिंकले जाते, पण ती पकडायला मनगट लागते ते जनतेकडे, शिवसैनिकांकडे आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांना जागा दाखवून देणार. संघमुक्त भारत हवे म्हणणारे नितीश कुमार भाजपला कसे चालतात. बिहारमध्ये मोफत लस देताय ती कोणाच्या पैशाने,  मग आम्ही काय बांगलादेशचे? असा सवाल त्यांनी केला. रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत. इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी.  आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाही. वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाला दिले. 

Web Title: If GST fails, Modi should apologize; Uddhav Thackeray removes 'mask' and slaps BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.