आज निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदी सरकार येणार, भाजपाला एवढ्या जागा मिळणार
By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 23:50 IST2021-01-21T23:47:17+5:302021-01-21T23:50:36+5:30
Narendra Modi News : आज प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार आजच्या घडीला देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता आहे.

आज निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदी सरकार येणार, भाजपाला एवढ्या जागा मिळणार
नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले कोरोना संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन यामुळे मोदी सरकारविरोधात असंतोष वाढला आहे. अशा परिस्थितीत या असंतोषाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला बसेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार आजच्या घडीला देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था ही २०१९ प्रमाणेच राहणार आहे.
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने कार्वी इनसाइड्स लिमिटेडसोबत केलेल्या या सर्व्हेनुसार देशात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाला पुन्हा एकदा स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत भाजपा आणि एनडीएच्या जागा घटण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळतील. तर भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ मिळतील असा अंदाज आहे. २०१९ च्या तुलनेत एनडीएच्या ३२ जागा तर भाजपाच्या १२ जागा घटण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेनुसार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा आणि काँग्रेसला १९ टक्के मतांसह ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला २०१९ च्या तुलनेत एका जागेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यूपीए आणि एनडीएमध्ये समावेश नसलेल्या अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षांना मिळून ४४ टक्के मतांसह २०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांमध्ये यूपीए, एनडीएमधील आणि या दोघांबाहेरील पक्षांचा समावेश आहे.