I don't claim to be 'just mature' - Shaumika Mahadik; Criticism of Sharad Pawar's statement | ‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका

कोल्हापूर : ‘मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर,’ असा माझा अजिबात दावा नाही, असे ट्विट जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी बुधवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शरसंधान केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली.

घडले ते असे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ याने अयोध्येत राममंदिर होत असल्याचे स्वागत करून बांधकामास शुभेच्छा देणारे खुले पत्र मंगळवारी लिहिले होते. राममंदिराच्या पायाभरणी समारंभावर शरद पवार यांनी टीका केली होती. त्यामुळे पार्थ यांनी त्याच्या उलट भूमिका घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला. पार्थने अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर पवार यांनी तो अजून इमॅच्युअर असल्याने त्याच्या मागणीला कवडीची किंमत देत नसल्याचे सायंकाळी सहा वाजता म्हटले. 

हाच इमॅच्यु्अरचा संदर्भ घेऊन महाडिक यांनी लगेच सात वाजता ट्विट केले. त्यामध्ये त्या म्हणतात, मघाशी एका ट्विटमध्ये चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. मी चुकले हे मला मान्य आहे. मी चुकूच शकत नाही. मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे मॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही. लगेच, दुसऱ्या ट्विटमध्ये त्या असे म्हणतात की, आज गोपाळकाला आहे. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या पार्थच्या युद्धात ज्याने सारथ्य केले, त्या श्रीकृष्णाचा दिवस... पार्थ पवार आणि महाभारतातील पार्थ व त्याला कौटुंबिक वादाची किनार हे थेट पवार यांना जोडणारे असल्याने हे ट्विट चर्चेचे ठरले.
 

Web Title: I don't claim to be 'just mature' - Shaumika Mahadik; Criticism of Sharad Pawar's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.