home minister amit shah made his stand clear about alliance with shiv sena | पुन्हा शिवसेनेसोबत युती करणार का?; अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

पुन्हा शिवसेनेसोबत युती करणार का?; अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई: मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं. 

राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले...

शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेना गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्यानं भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. त्यावर अमित शहांनी 'नेटवर्क१८' ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. 'एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,' असं शहा म्हणाले.

आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

शिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे प्रश्न शहांना विचारण्यात आले. त्यावर 'मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकांवर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करू शकतो?,' असं शहा यांनी म्हटलं.

कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री

राज्यपाल कोश्यारींच्या पत्राबद्दल नाराजी
भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करून दिली. 'मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,' असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असाही प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वापरलेल्या शब्दांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्यपालांच्या पत्रातील मजकूराबद्दल नाराजी व्यक्त केली. 'राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं. राज्यपालांनी ते विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड टाळायला हवी होती,' असं शहा म्हणाले. 

Web Title: home minister amit shah made his stand clear about alliance with shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.