entry of independent MLA Geeta Jain from Mira Bhayander will hurt BJP and benefit Shiv Sena | मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धक्का तर शिवसेनेला फायदा

मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धक्का तर शिवसेनेला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी शनिवारी मातोश्रीवर मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला . भाजपाने राज्यातील सत्ता स्थापनेसाठी गीता जैन यांचा पाठिंबा घेतला होता . मात्र स्थानिक पातळीवर त्यांना डावलण्याचे प्रकार होऊन देखील पक्षश्रेष्टींनीं लक्ष दिले नसल्याने अखेर त्यांनी भाजपाला रामराम ठोकत सेनेत प्रवेश केला . त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपाला मात्र धक्का बसला आहे . तर एक आमदार वाढल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढले असून मीरा भाईंदर मध्ये देखील शिवसेनेची ताकद वाढली आहे. 

 

आमदार गीता जैन ह्या त्यांचे पती भरत तसेच समर्थक भाजपा नगरसेवक परशुराम म्हात्रे , विजय राय , अश्विन कसोदरिया , माजी नगरसेविका सुमन कोठारी , ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी डॉ . सुरेश येवले आदींसह मातोश्रीवर पोहचल्या .  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गीता जैन यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला . भाजपाचे उपस्थित नगरसेवक - पदाधिकारी आदींनी मात्र सेनेत प्रवेश न करता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली . 

 

मातोश्री वरील या प्रवेश वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक , माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा सह सेनेचे नगरसेवक , पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी ठाकरे यांनी सर्वाना एकत्र राहून शहराचा विकास करा , मीरा भाईंदरकरांनी दाखवलेला विश्वास आणखी भक्कम होईल अशी कामे करा. लवकरच तुम्हा सर्वांची एकत्र बैठक घेऊ असे सांगितले.

 

आ. गीता म्हणाल्या की, मी भाजपाने विधानसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.  पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने प्रभावित असल्याने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पूर्णपणे समर्थन दिले होते . परंतु ३ महिने सत्ता स्थापनेत आणि ६ महिने कोरोना साथरोगात गेले . भाजपच्या वरिष्ठांना सातत्याने स्थानिक परिस्थिती बाबत माहिती दिली . परंतु त्यांच्या कडून आश्वासनच मिळाले . महिन्या भरा पूर्वी देखील पुन्हा चर्चा केली. तेव्हा सुद्धा आश्वासनच दिले गेले . 

 

शहरातील नागरिकांना निवडणुकीत जी आश्वासने दिली होती,  जी वचने दिली होती ती पूर्ण करणे आवश्यक आहे . १५ दिवसं पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटल्यावर त्यांनी पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले. त्यांनी आश्वस्त केले कि मीरा भाईंदरच्या विकासासाठी सर्व ते सहाय्य करू . म्हणून जनहितार्थ मी सर्वांशी चर्चा करून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असे आ. गीता यांनी म्हटले आहे. 

 

सतत वादग्रस्त ठरून देखील भाजपाने विधानसभेसाठी तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका असलेल्या गीता जैन यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांना दणदणीत विजयी सुद्धा केले. मेहतांच्या विरोधातील रोष जनतेने व्यक्त केल्या नंतर देखील भाजपाच्या वरिष्ठांनी मात्र मेहतांनाच झुकते माप दिल्याने आ. गीता ह्यांनी राज्यात भाजपाला पाठिंबा देऊन देखील एक वरिष्ठ नेत्याने मात्र मेहतांवर वरदहस्त कायम ठेवल्याने त्या नाराज होत्या. 

 

आ. गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशा मुळे भाजपाला धक्का मानला जात असून विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ कमी झाले आहे. शिवाय मीरा भाईंदर मध्ये सेनेची ताकद वाढणार आहे. कारण शिवसेनेची 145 विधानसभा मतदारसंघात फारशी ताकद नाही. परंतु गीता जैन सारख्या सर्वसामान्य जनतेत आपलं वेगळं स्थान असलेल्या नेतृत्वा मुळे शिवसेनेला मोठे बळ मिळणार आहे.

    

Web Title: entry of independent MLA Geeta Jain from Mira Bhayander will hurt BJP and benefit Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.