Education Minister Varsha Gaikwad infected with corona | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

मुंबई – राज्यात आज दिवसभरात १८ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाखांच्या वर पोहचला आहे. यातच ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत वर्षा गायकवाड यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी, सुरक्षित राहा, काळजी घ्या असं त्यांनी सांगितले आहे.

अलीकडेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल आहेत. विधानसभा अधिवेशनाआधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस विदर्भात पूरपरिस्थितीचा आढावा आणि विविध कामांसंबंधी दौरे केले. यादरम्यान कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यानंतर विधानसभा अधिवेशन घेण्यात आले. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडले.

राज्यातील मंत्री, नेत्यांना कोरोनाचा लागण

आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर खासदार नवनीत राणा कौर आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Read in English

Web Title: Education Minister Varsha Gaikwad infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.