Due to Corona Shiv Sena CM Uddhav Thackeray Dussera rally will be cancel this year | शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता

शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता

ठळक मुद्देकोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करु शकतातशिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यानं यंदाचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी खास

प्रविण मरगळे

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा कोरोनाचं संकट आहे. शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होतो. मात्र मुंबईत वाढत चाललेली कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता यंदाचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास सरकारकडून बंदी आहे.

या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. येत्या २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यावर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी विशेष असणार आहे. शिवसेनेची सत्ता, त्यात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती - तीही खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळंच महत्त्व आहे. पण अद्याप पक्षामध्ये दसरा मेळाव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, कोरोनाची परिस्थिती पाहता दसरा मेळावा होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्याबाबत कालांतराने निर्णय होईल. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करु शकतात असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

शिवसेना-शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे वर्षानुवर्ष समीकरण बनलं आहे. दसऱ्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर गर्दी जमत असे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे झाला होता. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेसाठी शिवतीर्थ..याठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दसऱ्याच्या दिवशी दणाणून जायचा.

शिवसेनेचा दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यातून बाळासाहेब राज्य तसेच देशाच्या राजकारणावर आसूड ओढत असे. प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते, त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषण होत असे आणि सर्वात शेवटी पक्षाचे प्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.

शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा दसरा मेळावा रद्द झाला होता. २००६ मध्ये प्रचंड पाऊस आल्यामुळे मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती तर २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मेळावा पुढे ढकलला होता. यंदा देशभरात तसेच राज्यात कोरोनाचं संकट आहे. अनेक सण-उत्सव कोरोनामुळे रद्द करावे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमू नये यासाठी शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा खुल्या मैदानात होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र व्हर्च्युअल माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील असंही बोललं जातं आहे.  

 

Web Title: Due to Corona Shiv Sena CM Uddhav Thackeray Dussera rally will be cancel this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.