'Difference, land and air!', Tweeting a photo of Congress leader targeting Devendra Fadnavis | 'फरक, जमिनीचा व हवेचा!', फोटो ट्विट करत काँग्रेस नेत्याचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

'फरक, जमिनीचा व हवेचा!', फोटो ट्विट करत काँग्रेस नेत्याचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

ठळक मुद्देयुवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबईः राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावरून युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सत्यजित तांबे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस यांचा गेल्यावर्षी आलेल्या पूराची हॅलिकॉप्टरमधून पाहणी करतानाचा फोटो आणि आताचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतल्याचा फोटो, असे तीन फोटो ट्विट केले आहेत. तसेच,  या फोटोला सत्यजित तांबे यांनी फरक जमिनीचा व हवेचा, अशी कॅप्शन दिली आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये माणूस सत्तेवर असताना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगले. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका
बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एक जबाबदार नेते आहात. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल, याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्यासाठी आधी काम करा. तुम्ही सध्या नियमितपणे बिहारला जात आहात. तसे थोडे दिल्लीतही जा. तुम्ही दिल्लीत गेलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री थिल्लरपणा करत आहेत- फडणवीस  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. तसेच, इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. 
 

Web Title: 'Difference, land and air!', Tweeting a photo of Congress leader targeting Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.