Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:51 AM2021-06-11T10:51:01+5:302021-06-11T10:55:09+5:30

मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशा स्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.

Coronavirus: Raj Thackeray emotional letter to party activists on the occasion of his birthday | Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Next
ठळक मुद्दे अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात तिथे सुरक्षित राहा.थोड्याच दिवसांत मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.

परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे.

वाचा राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो, तुम्ही फार प्रेमानं अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, ऊर्जा मिळते. तशी ऊर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे, तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहत असतो.

मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखचं. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसांत १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले आणि १,६४,७४३ जण आताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वैगेरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

हे वातावरण असं आहे की, आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठीभेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळलं पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की, माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात तिथे सुरक्षित राहा. आपल्या कुटुंबियांची आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमानं याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वांनी या काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत. ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात राहा. अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवाने सोडून गेले. तसेच कुणाचे रोजगार गेले. त्या सर्वांना धीर द्या. त्यांच्यासाठी आता करत आहात तसंच काम करत राहा. आजवर राखलंत तसेच परिस्थितीचं भान राखा.

थोड्याच दिवसांत मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथं आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात राहा. महाराष्ट्राला आता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात राहा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन

लवकरच भेटू

आपला नम्र

राज ठाकरे  

Web Title: Coronavirus: Raj Thackeray emotional letter to party activists on the occasion of his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app