Corona vaccination: "केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून होतोय गैरवापर"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:20 IST2021-06-04T14:15:35+5:302021-06-04T14:20:17+5:30
Corona vaccination in Mumbai: मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला गंभीर आरोप.

Corona vaccination: "केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून होतोय गैरवापर"
मुंबई - महाविकास आघाडी सरकार व मुंबई महानगरपालिका यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली खरी, परंतु ग्लोबल टेंडर मधील आगाऊ भरणा करणार नसल्याच्या अटीमुळे अनेक कंपन्यांनी लस देण्यास असमर्थता दर्शवली आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतील 45 पेक्षा जास्त वयोगटासाठी केंद्र सरकारकडून पाठविण्यात आलेल्या लसी आपापल्या जिल्ह्यांत व बॉलिवूडमधील लोकांसाठी वापरण्याचा प्रकार सुद्धा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व हेकेखोर कारभारामुळे वंचित राहणाऱ्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिक लसीकरणा पासून वंचित आहे. त्यामुळे आज दि,4, व 5, 6 जून या तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीमचे आयोजन केले असून या अंतर्गत 18 ते 44 वयोगटातील किमान 5000 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार भातखळकर यांनी दिली.
आमदार अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून आणि अपोलो हॉस्पिटल व स्पंदन सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून आज पासून सुरू झाले.मालाड पूर्व, चिल्ड्रन्स अकॅडमी येथे आयोजित तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहिमेचे आज भातखळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच भविष्यात अशा प्रकारचे आणखी लसीकरण अभियान आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच, या लसीकरण मोहिमेअंतर्गत माध्यमकर्मी व पत्रकारांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील 100 पेक्षा जास्त पत्रकारांचे सुद्धा मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.