राहुल गांधींच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र;  ‘त्या’ पत्रावर संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:06 AM2020-08-24T01:06:37+5:302020-08-24T07:08:03+5:30

सोनिया गांधी यांनी राजीनामा का द्यायचा? केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनीच राजीनामे द्यायला हवे.

Conspiracy to blunt the edge of Rahul Gandhi's leadership; Sanjay Nirupam's reaction to 'that' letter | राहुल गांधींच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र;  ‘त्या’ पत्रावर संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र;  ‘त्या’ पत्रावर संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेले पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच हे पत्र माध्यमांत झळकल्याने पक्षातील नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाची पुढील वाटचाल आणि नेतृत्वाबाबत काही दिवसांपूर्वी हे पत्र लिहिले होते. निरुपम यांनी या पत्रप्रपंचावर टीका केली आहे. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत बंद खोलीत जी षडयंत्रे रचली जात होती, ती या पत्राच्या रूपाने समोर आली. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारणार नसल्याचा हट्ट सोडून द्यावा, नेतृत्व हाती घ्यावे व पक्षाची पडझड थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधीच काँग्रेसला वाचवू शकतात, असे निरुपम म्हणाले.

सोनिया गांधी यांनी राजीनामा का द्यायचा? केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनीच राजीनामे द्यायला हवे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. कार्यकारिणीही पराभवाला जबाबदार असल्याचे सांगत, आतापर्यंत किती सदस्यांनी राजीनामे दिले, असा सवाल निरुपम यांनी केला.

 

Web Title: Conspiracy to blunt the edge of Rahul Gandhi's leadership; Sanjay Nirupam's reaction to 'that' letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.