राज्यसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:23 IST2021-02-07T23:22:24+5:302021-02-07T23:23:43+5:30
गुलाम नबी आझाद यांची या आठवड्यात निवृत्ती, मल्लिकार्जुन खरगे आघाडीवर

राज्यसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद या आठवड्यात निवृत्त होत असल्यामुळे या जागेसाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आझाद यांच्याकडे ही जबाबदारी होती. तथापि, गेल्या वर्षी पक्ष श्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारली. संधी का नाकारली याची कारणे अज्ञात आहेत. आझाद यांच्या जागेसाठी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे आणि दिग्विजय सिंह आदी नेते उत्सुक आहेत. योगायाेगाने काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी संघटनात्मक निवडणुकाही घ्यायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी कोणाकडे देतात हे महत्त्वाचे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी सुरक्षित खेळी खेळतील आणि नेतृत्वाची जबाबदारी खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे देऊ शकतील. खरगे २०१९ मध्ये पराभूत होईपर्यंत लोकसभेत पाच वर्षे पक्षाचे नेते होते. गेल्या वर्षी पक्ष नेतृत्वाविरोधात ज्या २३ नेत्यांनी पत्र लिहिले होते त्यात समाविष्ट असलेले आनंद शर्मा यांना अंधूकशीच संधी आहे. तथापि, नंतर शर्मा यांनी नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधी यांची तेवढी मर्जी नाही. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी समन्वयाने राज्यसभेतील नेते काम करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर राहुल गांधी नाराज आहेत. गेल्या आठवड्यात लोकसभा तहकूब करण्यास विरोधकांनी भाग पाडले असताना राज्यसभेचे कामकाज सामान्यरीत्या सुरू होते.
चिदंबरम यांनाही हवी आहे आझाद यांची जागा
पी. चिदंबरम यांनाही आझाद यांची जागा हवी आहे. चिदंबरम हे त्या नेत्यांत खूप सक्षम आणि अनुभवी आहेत, असे पक्षातील अनेकजण म्हणतात. विरोधी पक्षनेत्याचे पद हे कॅबिनेट दर्जाचे आहे.