राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 07:16 PM2019-04-11T19:16:06+5:302019-04-11T19:16:50+5:30

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. भाजपाची ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे.

congress on center in Nationalist Congress Party and bjp Battle | राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

Next
ठळक मुद्देहर्षवर्धन पाटील यांची मनधरणी। राष्ट्रीय समाज पक्षाची समजूत काढण्यात यश

अविनाश थोरात 
बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. बारामतीतील लेकींच्या या संघर्षात राष्ट्रवादी- भाजपाची लढाई होणार असली तरी निवडणुकीच्या केंद्रस्थानी कॉँग्रेस आली आहे. 
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात कॉग्रेसला कधी नव्हे ते महत्व या निवडणुकीत मिळाले आहे. दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. त्या स्वत: बारामतीच्या असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. भाजपाची ही ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे. सध्या या मतदारसंघात सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे तर चार इतर पक्षांचे आहेत. इंदापूर, भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदरमध्ये कॉँग्रेसची ताकद आहे. कुल यांना छुप्या पध्दतीनेही ही ताकद मिळू नये यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळेच कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी पवार कुटुंबियांच्या चकरा सुरू आहेत. सर्वात प्रथम सुप्रिया सुळे, नंतर अजित पवार आणि मंगळवारी शरद पवार यांनी पाटील यांची भेट घेतली. तीन वेळा भेटण्याच्या कारणांची चर्चा सुरू आहे. इंदापूर आणि पुरंदरच्या जागा सोडण्याचे आश्वासन घेण्याच्या तयारीत कॉँग्रेस आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वत:च्या बारामती मतदारसंघात कॉँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच ही स्थिती येणार आहे.
दुसऱ्या  बाजुला कांचन कुल यांनी भाजपाचे चिन्ह घेतल्याने रासपची नाराजी दूर झाली आहे. महादेव जानकर त्यांचा अर्ज भरताना उपस्थित होते. शहरी मतदानावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे कुल यांचे धोरण आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीच्या बालेकिल्याला भगदाड पाडण्यासाठी तळ ठोकला आहे.  शिवसेनेचीही साथ आहे. मात्र, गेल्या वेळी जातीय समीकरण आणि पवारांविरुध्दची नाराजी कॅश करण्यात भाजपाला यश मिळाले होते. त्याच पध्दतीचे वातावरण या वेळी तयार होणार का हा प्रश्न आहे. गेल्या वेळीच्या झटक्याने सुप्रिया सुळे यांनी पाच वर्षे मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यांच्या विरोधात भाजपाच्या नवख्या उमेदवार  टिकणार का, हे औत्सुक्याचे आहे. 
..........
जनतेच्या कर रुपातून जमा पैसा स्वत:ची जाहिरात करण्यासाठी वापरला. हा पैसा शेतकºयांची कर्जमाफी करण्यासाठी वापरला असता. या सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला फसविण्याचे काम केले. शेतीमालाला हमीभाव देण्याबरोबर बेरोजगारीचा प्रश्न आहे.
 - सुप्रिया सुळे,  राष्टÑवादी
..........
सर्वसामान्य जनता आणि महायुती आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. बारामतीच्या बाहेर विकास झालेला नाही. येथील जनतेला आजही टॅँकरच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागते. - कांचन कुल, भाजपा
..............
कळीचे मुद्दे
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीशिवाय इतर भागांचा विकास झालेला नाही. यासाठी शरद पवार यांना जबाबदार धरले जात आहे. 
भारतीय जनता पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी आहेत, साखर उद्योगाला मारक असल्याची टीका राष्ट्रवादी कडून केली जात आहे. 

Web Title: congress on center in Nationalist Congress Party and bjp Battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.