cm uddhav thackeray and mns chief raj thackeray likely to come together for program | ...तर 'बाळासाहेबां'मुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसणार

...तर 'बाळासाहेबां'मुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसणार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याआधी मे महिन्यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. मात्र त्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण २३ जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. घरी आलेल्या पाहुण्यांचं अगत्य करणं हे ठाकरे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहेत. कृष्णकुंजवर त्याचा अनुभव आला. राज ठाकरेंनी आमच्यासोबत १०-१२ मिनिटं संवाद साधला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या,' असं पेडणेकर राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या.

मुंबई महापालिकेनं कुलाब्यात बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकते. याआधी दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. शिवाजी पार्कमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याचं आमंत्रण राज यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरे उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध आहे. बाळासाहेबांचा पुतळा रहदारी असलेल्या भागात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो, असा आक्षेप स्थानिकांसह आपली मुंबई संस्थेनं नोंदवला आहे. मात्र पालिकेनं २३ जानेवारीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.
 

Web Title: cm uddhav thackeray and mns chief raj thackeray likely to come together for program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.