मुंबई : देशातील प्रत्येक घटकांचा विचार करुन कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून देशाला उभे करण्यासाठी आज सादर झालेला देशाचा अर्थसंकल्प 'सबका साथ सबका विकास' असाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत हेच आजच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली आहे. (Budget 2021 Latest News and updates)
अन्नदात्या शेतकऱ्यांना समर्पित अर्थसंकल्प सादर करताना मध्य वर्गीय करदात्यांच्या खिशात हात न घालता, देशातील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेणारा आजचा अर्थसंकल्प आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योजक अशा सर्वच आघाड्यांवर देशाला एक नवीन गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
याचबरोबर, नागपूर मेट्रोच्या दुसर्या टप्प्यासाठी 5976 कोटी, नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी यातून केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील छोट्या शहरांच्या विकासाचा ध्यास दिसून येतो. आरोग्य क्षेत्राचा 131 टक्के खर्च वाढविण्यात आला आहे. 28 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक भक्कम करण्यात येणार आहे. 35 हजार कोटी रूपयांची कोरोना लसीकरणासाठी तरतूद हे सामान्यांना दिलासा देणारी असून गरिबांच्या आरोग्याची काळजी सरकारने केली आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरसह राष्ट्रीय रस्ते निर्माणासाठी 1,18,000 कोटी आणि रेल्वेसाठी 1,10,055 कोटी अशा सुमारे 1.30 लाख कोटींची गुंतवणूक पायाभूत क्षेत्राला भक्कम करणारी आहे. परवडणार्या घरांसाठी प्राप्तीकरात व्याज सवलत देण्यात आल्याने. मध्यमवर्गीय माणसाला परवडणारी घरे उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारे देशाला आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.