Budget 2021 : समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:14 PM2021-02-01T16:14:59+5:302021-02-01T16:17:17+5:30

Budget 2021 Latest News and updates, Chandrakant Patil : शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती – जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Budget 2021: Budget that gives relief to all sections of the society - Chandrakant Patil | Budget 2021 : समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

Budget 2021 : समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

Next

मुंबई : कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला. त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  (Budget 2021 Latest News and updates)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडून गतीने आर्थिक विकास होण्यासाठीही या अर्थसंकल्पात विचार केला आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे. 

नाशिक मेट्रो व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारात चांगली आर्थिक तरतूद केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले, लघू उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. पंचाहत्तरपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विविध तरतुदींमुळे मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळेल. याचबरोबर, शेतकरी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीची तरतूद ३०,००० कोटींवरून वाढवून ४०,००० कोटी रुपये केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठीची तरतूद दुप्पट केली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवून साडेसोळा लाख कोटी रुपये केली आहे. ग्रामीण भागातील प्रॉपर्टीची मालकी स्पष्ट करणारी स्वामित्व योजना देशभर लागू केली आहे. पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातीसाठीची ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेचा विस्तार करून ती आता २२ पिकांना लागू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करता यावी यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती – जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

याशिवाय, ते म्हणाले की, गहू, तांदूळ, डाळी, कापूस यांच्या खरेदीसाठी मोदी सरकारने किती मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला याची सविस्तर आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. एमएसपीच्या आधारे धान्य खरेदीबाबत मोदी सरकार किती चांगल्या रितीने काम करत आहे, हे यावरून स्पष्ट होते. दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच,  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे.

Web Title: Budget 2021: Budget that gives relief to all sections of the society - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.