आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

By कुणाल गवाणकर | Updated: November 23, 2020 13:34 IST2020-11-23T13:33:43+5:302020-11-23T13:34:14+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अखंड भारत' विधानावरून संजय राऊतांचा चिमटा

Bring PoK first will go to Karachi later shiv sena mp Sanjay Raut on devendra Fadnavis akhand Bharat remark | आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई: कराची स्वीट्सवरून शिवसेनेमधील मतमतांतरं समोर आली असताना आता यावर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आमचा अखंड भारतावर विश्वास आहे. त्यामुळे कराची एक दिवस भारतात येईल, असा विश्वास मला वाटतो, असं फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कराची स्वीट्सच्या मुद्द्यावरून शिवसेनेत असलेल्या मतभेदांवर भाष्य करत टोला लगावला. त्यानंतर फडणवीस यांना लगेचच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ

कराची स्वीट्सच्या नावावरून झालेल्या वादंगावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपला अखंड भारतावर विश्वास असल्याचं म्हटलं. आम्ही अखंड भारत मानतो. एक दिवस कराचीदेखील भारताचा भाग असेल असा मला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्समध्ये जाऊन दुकानाचं नाव बदला, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. नांदगावकर यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं राऊत म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनीच त्यांच्या नेत्याला समजावलं हे चांगलंच झाल्याचं फडणवीस म्हणाले.




यानंतर राऊत यांनी अखंड भारताबद्दलच्या विधानावरून फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस यांच्या विधानाचं आम्ही स्वागत करतो. आधी पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारतात आणा. मग नंतर आपण कराचीपर्यंत जाऊ, असा चिमटा त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला आज वर्ष पूर्ण झालं. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. 'ती पहाट नव्हती. अंधकार होता. आता तसं पुन्हा घडणार नाही. पुढील चार वर्षच काय, त्यानंतरही असा प्रकार घडणार नाही,' असं राऊत म्हणाले. पहाटे पहाटे मला जागा आली असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. तेव्हापासून त्यांना झोपच लागलेली नाही. पण आता ती सकाळ पुन्हा येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं.

पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...

इंधनाचे दर कमी करून दिलासा द्या; राऊतांचा भाजपला सल्ला
वाढीव वीज बिलांविरोधात आज राज्यभरात भाजपची आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. वाढीव वीज बिल प्रश्नावरून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटावं, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी इंधन दरांकडेही लक्ष वेधलं. 'आम्ही वाढीव वीज बिलावरून जनतेला दिलासा देऊ. पण भाजपच्या नेत्यांनी इंधन दराकडे लक्ष द्यावं. त्यातूनही जनतेला दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही कमी व्हायला हवेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल, डिझेलचे दर ४५ ते ५० रुपये असायला हवेत. यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,' असं राऊत म्हणाले.

Web Title: Bring PoK first will go to Karachi later shiv sena mp Sanjay Raut on devendra Fadnavis akhand Bharat remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.