होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 22:23 IST2021-01-06T22:22:51+5:302021-01-06T22:23:15+5:30
वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनावरून गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा

होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
पुणे: वाफगाव किल्ल्यातील शाळा दुसरीकडे हलवून किल्ल्याच्या संवर्धनासाठी पन्नास कोटी देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. समस्त धनगरांची, बहुजन समाजाची आस्था या किल्ल्यात आहे. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण नको, असं पडळकर म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी द्या, असं पडळकर म्हणाले.
वाफगाव किल्ल्याला संवर्धित वास्तूचा दर्जा देण्याची मागणी पडळकर यांनी केली. वाफगाव किल्ल्याचं संवर्धन, जतन व्हायला हवं. त्यामुळेच या किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. ही संस्था सरकारच्या ताब्यात द्यावी किंवा होळकरांच्या ताब्यात द्यावी. जे योग्य असेल ते करावं. या वास्तूला संवर्धित वास्तूचा दर्जा देऊन ५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं त्वरित द्यायला हवा, अशी मागणी पडळकर यांनी केली.
वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/XTyddeOfVg
— Lokmat (@MiLOKMAT) January 6, 2021
होळकर यांनी रयत शिक्षण संस्थेला १९५५ मध्ये ही वास्तू दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी यामागे होती. गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावं या भावनेपोटी ही वास्तू रयत शिक्षण संस्थेला दिलेली आहे. आज संस्था खूप मोठी झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. भाऊराव पाटील यांचा शिक्षणाबद्दलचा हेतू स्वच्छ होता. मात्र त्या हेतूपासून आज ही संस्था दूर गेल्यासारखी वाटते. नुकताच या संस्थेतील मोठा भ्रष्टाचारदेखील समोर आला आहे, असं पडळकर म्हणाले.
आम्ही शिक्षणाच्या विरोधात नाही. हे शिक्षणाचं, विद्येचं मंदिर आहे. याच वास्तूत ६५ वर्षे विद्या मंदिर चाललं. आता ही इमारत पडझडीच्या परिस्थितीत आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना धोका होऊ शकतो. म्हणून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ निर्णय घ्यावा. याशिवाय सरकारनं वास्तूच्या संवर्धनासाठी ५० कोटींचा निधी द्यावा. मल्हारराव होळकरांनी वाफगावसारखे सहा भुईकोट किल्ले उभारले. त्यापैकी हा एकच किल्ला आता उरलेला आहे आणि त्याची ही पडझड झाली आहे. त्यामुळे किल्ल्याची डागडुजी गरजेची आहे. तरच इतिहास जपला जाईल, असं पडळकर यांनी म्हटलं.