सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:52 IST2020-12-16T02:53:12+5:302020-12-16T06:52:12+5:30
शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ पैसा नाही

सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला
मुंबई : ४३ मंत्र्यांचा कोटा पहिल्याच फटक्यात पूर्ण केला, सरकारची गाडी भरली, पण आता किमान पहिला गिअर तर टाका. शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ पैसा नाही, पण वाईन उद्योगाला ५० कोटी दिले, ‘वाईन और जिंदगी फाईन ’असे चालले आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना चौफेर फटकेबाजी केली.
राज्यातील लाखो आदिवासी कुटुंबांना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजारांच्या चहापत्ती, वाटाणे, धान्य आदी देणे म्हणजे डीबीटीला मूठमाती देण्याचा कंत्राटदारधार्जिणा प्रयत्न आहे. वाटाणा खाण्याची आदिवासींना सक्ती कशासाठी? असे वाटाणे खाऊ घालाल तर तुमच्या हाती फुटाणे येतील, असा टोलाही त्यांनी हाणला.
तुमचे सरकार २५ वर्षे नाही तर महाराष्ट्राच्या निर्मितीला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हापर्यंत टिकवा, तेव्हा आदित्य ठाकरेंच्या हाती झेंडा द्या. वाढीव वीजबिल माफ करण्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.