bjp leader prasad lad met mns leader raj thackeray after that spoke on upcoming bmc elections confident about bjp mayor | मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

ठळक मुद्देशिवसेनेची परंपरागत सत्ता आम्ही काढून घेऊ, प्रसाद लाड यांचं वक्तव्यमुंबई पालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, लाड यांचा विश्वास

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय समजले जाणारे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल आणि योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असं सूचक विधानही केलं.

"भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ताकदीनं लढणार हे निश्चित आहे. योग्य वेळी योग्य ते उत्तर दिलं जाईल. भाजपचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे लोकं आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तीक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली," असं प्रसाद लाड म्हणाले. 

"भाजपचा महापालिकेत महापौर बसेल आणि भाजपचाच झेंडा महापालिकेवर फडकेल हे मी आत्मविश्वासानं सांगत आहे. अद्याप महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या नाही. जी काही गणितं आहेत ती महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यावरच होत असतात. त्यामुळे मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मेट्रो ३ च्या कारशेडवरुन सुरू असलेल्या वादावरही भाष्य केलं. 

"कांजुरमार्गच्या जागेच्या बाबतीत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं ही केंद्राची जागा असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानंही त्यावर आक्षेप नोंदवला आहे. केवळ बालहट्टापायी हा निर्णय सतत समितीच्या माध्यमातून, मुख्य सचिवांच्या माध्यमातून लादण्याच्या प्रयत्न केल्यास मुंबईच्या जनतेवर अन्याय करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं बालहट्ट सोडावा. गोरेगावच्या जागेला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. यामुळे सरकारचे ५ हजार कोटी रूपये वाचणार आहेत. याचा निर्णय सरकारनं घ्यायला हवा. जनेतेचे हाल होण्यापासून थांबवलं पाहिजे. जे मेट्रोचं काम एक वर्ष पुढे ढकललं गेलंय ते लवकर पूर्ण करून मुंबईच्या जनतेला न्याय द्यायला हवा," असंही लाड यांनी नमूद केलं.

Read in English

Web Title: bjp leader prasad lad met mns leader raj thackeray after that spoke on upcoming bmc elections confident about bjp mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.