BJP Devendra Fadnavis letter to Chief Minister Uddhav Thackeray | “सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज”; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

“सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज”; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

ठळक मुद्देमराठवाड्यात घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे खचला आहे विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत अशी अपेक्षा बांधावर जाऊन जी मदत आपण जाहीर केली तशीच ठोस मदत कधीतरी आपल्याला मिळेल अशी शेतकऱ्यांना आस आहे

मुंबई – विदर्भातील पुरानंतर मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तर सुपीक मातीसुद्धा वाहून गेली आहे. जवळजवळ १८०० पेक्षा अधिक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र अद्यापही पंचनामा झाल नाही, कोरोनाच्या संकटात बळीराजा हवालदिल झाला याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जालन्यात मोसंबीचे नुकसान, सावरगाव, भिलपुरी, मौजपुरी, माणेगाव, नसडगाव आणि इतरही तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन इ पिकांचे नुकसान, परभणीत अजूनही शेतात पाणी आहे. काही शेतकऱ्यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले. हीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे. मराठवाड्यात घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे खचला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहोत असं सांगून मोकळे व्हायचं, असे करून चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा मातीमोल केले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात सातत्याने हे अस्मानी संकट त्यामुळे मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. याचवेळी त्याच्या पाठिशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात मागणी केली आहे.

दरम्यान, विदर्भात पूर आला तेव्हाही सरकारकडून मदत करू अशा घोषणा केल्या गेल्या. पण केवळ तोंडदेखली मदत करायची म्हणून १६ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करुन थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी विनंती आहे. केवळ घोषणा करून, पंचनामे आदेश दिले असे सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. बांधावर जाऊन जी मदत आपण जाहीर केली तशीच ठोस मदत कधीतरी आपल्याला मिळेल अशी शेतकऱ्यांना आस आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही, आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

Web Title: BJP Devendra Fadnavis letter to Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.