Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार घोषित; मेधा कुलकर्णींचा पत्ता कट
By प्रविण मरगळे | Updated: November 9, 2020 13:45 IST2020-11-09T12:51:34+5:302020-11-09T13:45:12+5:30
Vidhan Parishad Teacher And Graduate Elections: कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार घोषित; मेधा कुलकर्णींचा पत्ता कट
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. त्यांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (राष्ट्रवादी) यांचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव केला होता. चंद्रकांत पाटील गेल्यावर्षी विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त होती. या पुण्याच्या जागेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे हे इच्छुक होते, तर त्याचसोबत कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना ही उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश एवं महाराष्ट्र में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव 2020 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/vp4KXrkJuN
— BJP (@BJP4India) November 9, 2020
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी येथून दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले. सध्याचे आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौरही राहिले आहेत. भाजपाने यावेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. यावेळी भाजपाने या मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता?; अद्यापही उमेदवार ठरेना
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना संधी दिली आहे. पण यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपाची वाट खडतर होऊ शकते.