भाजपकडून 'मिशन मुंबई'ची तयारी; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भातखळकरांवर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 19:29 IST2020-11-18T19:22:44+5:302020-11-18T19:29:35+5:30
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती

भाजपकडून 'मिशन मुंबई'ची तयारी; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भातखळकरांवर मोठी जबाबदारी
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई भाजपा कार्यकारिणी बैठकीत ही नियुक्ती जाहिर केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, असा विश्वास भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे.
अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्या समोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू अशी ग्वाही भातखळकर यांनी दिली. मुंबईकरांना आम्ही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून मुक्ती देऊ आणि पूर्ण बहुमताने भाजपाचा महापौर निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून अतुल भातखळकर ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहे. मेट्रो, हिंदुत्व, कथित जमीन घोटाळ्यावरून भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषत: त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.