Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:03 AM2020-10-16T02:03:03+5:302020-10-16T07:10:09+5:30

अनेक लहान पक्ष मैदानात : कोण खाणार कोणाची मते

Bihar Election 2020: Rahul, Priyanka Gandhi will campaign aggressively | Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

Next

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली: बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक ही दुरंगी न राहता बहुरंगी बनली आहे. २०१५ च्या आधी लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते; पण यंदासारखे त्यांचे तगडे आव्हान कधी पाहण्यास मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत.

बिहारच्या राजकारणात पूर्वी काँग्रेसचा दबदबा त्यानंतर लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांचेच वर्चस्व राहिले आहे. २०१० च्या निवडणुकीनंतर भाजपनेदेखील आपली पकड घट्ट केली. २०१५ ची निवडणूक राष्ट्रीय जनता दल, जनता दल (यु), काँग्रेस व मित्र पक्षांच्या महागठबंधन विरोधात भाजप, एलजेपी यांच्या एनडीएमध्ये झाली होती. त्यावेळी एमआयएमसह इतर पक्षांनी उमेदवार दिले होते; पण त्यांना जनतेने महत्त्व दिल्याचे दिसले नाही.

यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक मतदारसंघानुसार गणित बदललेले आहे. भाजप, जनता दलाची (यु) रालोआ कागदावर वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र त्यांच्या उमेदवारांना राजद-काँग्रेस महागठबंधनसह जीडीएसएफ (उपेंद्रसिंह कुशवाह), एलजेपी, पीडीए (पप्पू यादव), एलजेपी (चिराग पासवान) या पक्षांच्या उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांचे झालेले निधन व पासी समाजाकडून मिळत असलेले समर्थन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला पक्ष प्रवेश, केंद्रात मोदी; पण बिहारमध्ये नितीशऐवजी कोणी, अशा भूमिकेमुळे एलजेपी यावेळी गेमचेंजरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचप्रमाणे जीडीएसएफदेखील धक्कादायक निकाल देण्याच्या परिस्थितीत दिसते. पप्पू यादव यांच्या पीडीए आघाडीच्या उमेदवारांसह डाव्या पक्षांनीदेखील तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती, सरकारविरोधी भावना अन् सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी साठमारीत कोण कोणाला हरवणार व कोण कोणाला जिंकण्यासाठी मदत करणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार आणून निकालानंतरच्या राजकारणात गुंतलेला दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्टार प्रचारक असतील. प्रचारासाठी स्थानिक नेत्यांकडून ज्यांची मागणी पक्ष मुख्यालयात येत आहे, त्यात राहुल गांधींना जास्त मागणी आहे. काँग्रेसच्या बहुतेक उमेदवारांनी राहुल गांधी यांना प्रचारासाठी बोलावण्याची ही पहिली वेळ आहे. प्रियांका गांधी यांनाही अनेक नेत्यांनी प्रचारासाठी पाठवण्याचा आग्रह पक्ष श्रेष्ठींकडे केला आहे.

पक्ष नेतृत्वाने या मागणीची नोंद घेऊन राहुल गांधी बिहारमध्ये आठ ते दहा सभांमध्ये प्रचार करतील आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत रोड शो करतील, याशिवाय प्रियांका गांधी दोन सभांमध्ये प्रचार करू शकतील. राजद-काँग्रेस यांची युती असूनही आतापर्यंत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याराजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत संयुक्त सभेचे नियोजन झालेले नाही. प्रचारात भाग घेणाऱ्यांमध्ये तारिक अन्वर, शकील अहमद, मीरा कुमार, गुलामनबी आझाद, भूपेश बघेल, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, शत्रुघ्न सिन्हा आदींचा समावेश आहे.

Web Title: Bihar Election 2020: Rahul, Priyanka Gandhi will campaign aggressively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.