Bihar Assembly Election Results not made any claim for cm post says nitish kumar | Bihar Assembly Election Results: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?; नितीश कुमारांचं सूचक उत्तर

Bihar Assembly Election Results: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?; नितीश कुमारांचं सूचक उत्तर

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत बिहारच्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) कौल दिला. एनडीएची सत्ता आल्यास नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं भाजपकडून निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार स्पष्ट करण्यात आलं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील नितीशच मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट केलं. मात्र दस्तुरखुद्द नितीश कुमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे संभ्रम वाढला आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच नितीश कुमार संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. एनडीएच्या बैठकीत तारीख ठरेल, असं नितीश यांनी सांगितलं.
पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'मी दावा सांगितलेला नाही. याबद्दलचा निर्णय एनडीए घेईल,' असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. एनडीएच्या निर्णयानुसार पुढील गोष्टी ठरतील, असंही ते म्हणाले. राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर नितीश कुमारच नेतृत्त्व करतील, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र काही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी आग्रही मागणी केली आहे.
मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच राहणार असल्याचा शब्द भाजपकडून जेडीयूला निवडणुकीपूर्वी देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर परिस्थिती प्रचंड बदलली आहे. निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या जेडीयूची मोठी घसरण झाली आहे. २०१५ मध्ये जेडीयूचे ७१ आमदार निवडून आले होते. आता त्यांचे ४३ आमदार निवडून आले आहेत. तर २०१५ मध्ये ५३ जागा जिंकणाऱ्या भाजपनं यंदा ७४ जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.

Web Title: Bihar Assembly Election Results not made any claim for cm post says nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.