Big blow to BJP in Mumbai, Samir Desai tied Shivbandhan in the hands of Uddhav Thackeray | मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन

मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन

- मनोहर कुंभेजकर
मुंबई  -  2022 च्या पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्षांचा कालावधी आहे. मात्र शिवसेनेत आतापासूनच इनकमिंग सुरू झाले आहे. गोरेगावात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कंबर कसली आहे. गोरेगावतील भाजपाचा मोठा नेता समीर देसाई यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे अशी जोरदार चर्चा गोरेगावात आहे. समीर देसाई हे माजी नगरसेवक असून मुंबईभाजपाचे सचिव आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीत आज दुपारी 12 वाजता हातात शिवबंधन बांधून समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई,शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू,महिला विभाग संघटक व जेष्ठ नगरसेविका साधना माने,भूषण सुभाष देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

6 वर्षांपूर्वी दि,22 नोव्हेंबर 2014 रोजी काँग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.मात्र गेले काही दिवस ते भाजपावर नाराज होते.2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते.त्यांच्या पत्नी राजुल देसाई या भाजपाच्या प्रभाग क्रमांक 56 च्या विद्यमान नगरसेविका असून त्यांनी पी दक्षिण वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्षपद देखिल भूषवले होते. समीर देसाई यांच्या प्रवेशाने गोरेगावात शिवसेनेला मजबूती येईल अशी चर्चा आहे.

कोण आहेत समीर देसाई

समीर देसाई हे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार गुरुदास कामत कामत यांचे भाचे आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा त्यांनी महापालिकेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. गोरेगावमधून त्यांनी काँग्रेसचे नगरसेवकपद भूषवले होते. मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपद त्यांनी भूषवले होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते दहा वर्षे सदस्य देखिल होते.

Web Title: Big blow to BJP in Mumbai, Samir Desai tied Shivbandhan in the hands of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.