राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 05:06 PM2021-01-21T17:06:51+5:302021-01-21T17:19:34+5:30

Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

ashok gehlot can be next president of congress party leaders are considering on alternative of rahul gandhi | राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. अनेक बैठका झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष निवडता आलेला नाही. राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांच्या जवळचे तसेच विश्वासू मानले जाणारे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यावर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काँग्रेसच्या एका गटाचं अशोक गेहलोत यांना राजस्थानमधून दिल्लीला बोलावून घेत अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा पर्याय योग्य असल्याचं म्हणणं आहे. तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला स्थायी अध्यक्षाची गरज असल्याचं म्हटलं आहे. 'अमर उजाला'ने आपल्या रिपोर्टमधून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे हे पद सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार की काँग्रेसच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा पर्याय म्हणून विचार केला जाणार हे येत्या काळात स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. 

सोनिया गांधी यांचाही अशोक गेहलोत यांच्यावर खूप विश्वास आहे. राजस्थानच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तरुण नेतृत्व म्हणून सचिन पायलट यांच्यावर सोपवण्याऐवजी अनुभवी अशोक गेहलोत यांच्यावरच सोपवण्यात आली तेव्हाही ही गोष्ट स्पष्ट झाली होती. गेल्या वर्षीही अशोक गेहलोत यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा विचार समोर आला होता. मात्र गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जाण्याचा प्रस्ताव नाकारल्याचीही चर्चा सुरू होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचं सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केलं होतं. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी 23 नेत्यांनी पत्रातून केली होती. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता.

Web Title: ashok gehlot can be next president of congress party leaders are considering on alternative of rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.