“२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच”; ओवेसींची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:12 IST2021-11-24T15:11:32+5:302021-11-24T15:12:57+5:30
महाविकास आघाडीवर असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे.

“२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच”; ओवेसींची मोठी भविष्यवाणी
सोलापूर: आताच्या घडीला राज्यात काही ना काही मुद्द्यांवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी संप, आंदोलन, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता एआयएमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शिवसेना आणि भाजपबाबत एक भविष्यवाणी केली असून, २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा केला आहे.
थ्री इन वन आहे की टू इन वन आहे काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांनी? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का, या शब्दांत ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते सोलापुरात बोलत होते.
२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल
एमआयएमसोबत गेले तर जातीयवाद मग राहुल गांधींनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे? महाराष्ट्रात काय सुरु आहे? १९९२ ला काय झाले होते हे लोक अजून विसलरलेले नाहीत. असे असताना महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आली. ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह आहे. परस्पर विरोधी विचारधारेचे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात. २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, आम्ही निवडणूक लढवायला लागलो तर म्हणता मतांची विभागणी करतो. आम्ही मागणी केली तर जातीयवादी म्हणता. तुम्ही तर शिवसेनेला सत्ता दिली. त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देऊ शकता. तुम्ही काय ठेका घेतलाय का धर्मनिरपेक्षतेचा, अशी विचारणाही ओवेसी यांनी केली.