Arnab Goswami: Anvay Naik, BJP MLA Ram Kadam Detained by police for agitation in front of Mantralaya | Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्देज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली त्यांना निलंबित करावं आणि चौकशी व्हावी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही.भाजपा आमदार राम कदम यांचं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.

याबाबत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली त्यांना निलंबित करावं आणि चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली, पोलिसांचा आदर करतो, पण कायद्यानुसार अशाप्रकारे अर्णब गोस्वामींसारख्या पत्रकाराला मारहाण करणं योग्य नाही, त्यामुळे या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली, मात्र हे सरकार धुतराष्ट्राचं सरकार आहे, आंधळे आणि बहिरे सरकार असल्याने त्याची किंमत मोजावी लागेल. या सरकारला वठणीवर आणण्याचं काम जनता करेल अशी टीका राम कदम यांनी केली.

दरम्यान, हे लाक्षणिक उपोषण अर्णब गोस्वामींवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून करत आहोत, महाविकास आघाडी सरकारची जुलमी हिटलरशाही चालणार नाही, त्यांना अर्णब गोस्वामींसह सर्व पत्रकारांची माफी मागावी लागेल. मी विधानसभेचा सदस्य आहे, जर रस्त्यावर मी आंदोलन करत असेल तर सरकारने मला बोलावून माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, नाहीतर हे सरकार कोणत्या कातडीचे आहे कळेल असा टोलाही राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?   

प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकशाहीत पत्रकारिता चौथा स्तंभ आहे, पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं म्हटलं होतं.

Read in English

Web Title: Arnab Goswami: Anvay Naik, BJP MLA Ram Kadam Detained by police for agitation in front of Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.