राज ठाकरेंची माफी मागा! मनसेच्या खळखट्याकनंतरअॅमेझॉनची सपशेल माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 22:30 IST2020-12-25T22:24:14+5:302020-12-25T22:30:47+5:30
Amazon MNS Marathi News: अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

राज ठाकरेंची माफी मागा! मनसेच्या खळखट्याकनंतरअॅमेझॉनची सपशेल माघार
मुंबई : : मराठी भाषेचा पर्याय अॅमेझॉनवर असलाच पाहिजे अशी प्रमुख मागणी मनसेने केली होती. यावरून राज ठाकरेंना नोटीस गेल्याने आज उमटलेल्या खळखट्याकवरून अॅमेझॉनने सपशेल माघार घेतली आहे.
मुंबईत विविध ठिकाणी ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स झळकवले होते. तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय जर उपलब्ध झाला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ कडक इशारा देखील मनसेकडून दिला गेला होता. मात्र याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाची नोटीस आली. यानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्यातील अॅमेझॉनची कार्यालयेच फोडल्याने अॅमेझॉनने माघार घेतली आहे.
मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सात दिवसांची कालावधी द्यावा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा अॅमेझॉनने वापरली होती. तसेच राजसाहेब ठाकरे ह्यांच्यावर खटला भरण्याची धमकी देण्य़ात आली होती. आता मनसेने अॅमेझॉनला राज ठाकरेंची माफी मागण्याची मागमी केली आहे. मनसेने मुंबई, पुणे, वसई अशी तीन कार्यालये फोडली आहेत.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते मात्र.राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर अॅमेझॉनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा चित्रे यांनी दिला होता.
विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. त्यांनी तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते.
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे आक्रमक
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या पर्याय वापरण्यासंदर्भात सुरु करण्यात आलेल्या जोरदार मोहिमेला विरोध करण्यासाठी अॅमेझॉनने न्यायालयात गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस धाडली. यात राज ठाकरे यांच्यासह ठराविक मनसे सचिवांना ५ जानेवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र मनसेकडून या नोटिशीचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.