परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 14:17 IST2021-03-21T14:16:36+5:302021-03-21T14:17:20+5:30
Sharad Pawar reaction on Parambir Singh's allegations : परमबीर सिंह यांनी पत्रामधून केलेल्या आरोपींची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली आहे. तसेच आज तातडीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले....
नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी पत्रामधून केलेल्या आरोपींची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली आहे. तसेच आज तातडीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार प्रसारमाध्यमांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. परमबीर सिंह यांचे हे पत्र दोन भागात आहे. एका भागात अनिल देशमुख आणि दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणाचा उल्लेख आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेले हे पत्र धक्कादायक आहे. बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही. तसेच पैसे कसे दिले घेतले गेले याचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता, असा दावाही शरद पवार यांनी केला. तसेच उत्तम अधिकाऱ्याकडून या प्रकणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप केला होता.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला होता.