सातारचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीबाबत अजित पवार बोलले, राजकीय तर्कवितर्कांबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 16:38 IST2021-01-24T16:36:52+5:302021-01-24T16:38:10+5:30
AJit Pawar News : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली विचारणा...

सातारचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीबाबत अजित पवार बोलले, राजकीय तर्कवितर्कांबाबत म्हणाले...
बारामती - नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की,विकास कामासंदर्भात आमदार खासदारांचे एकमेकांना भेटणे होत असते .मी विरोधी पक्षात असताना विकास कामाबाबत त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडे माझी कामे घेऊन जात होतो. तशीच सातारा मतदारसंघाच्या विकास कामासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यांची जी कामे आहेत. त्या कामासंदर्भात मंत्रिमंडळात बैठक लावतो. असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
युतीचे सरकार असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी नुकताच केला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, यासंदर्भातील वृत्त मी माध्यमावर पाहिले आहे. याबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाची ऑफर कोणी व कशासाठी दिली होती याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय अधिक बोलणे उचित ठरणार नाही अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.
नागरिकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग व पोलीस खात्यातीलभरती करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात मी मागेच संबंधितांशी बोललो आहे. भरती करत असताना मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात निर्णय प्रक्रिया चालू आहे. जानेवारीत याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र ती तारीख फेब्रुवारी मध्ये निर्णय गेला आहे. मात्र राज्यात वेगवेगळी नोकरभरती होत असताना कोणताही समाज घटक वंचित राहणार नाही याबाबत महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.