राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?
By प्रविण मरगळे | Updated: September 22, 2020 13:42 IST2020-09-22T13:39:44+5:302020-09-22T13:42:16+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार रोहित पवारांनीही केली मागणी

राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने लॉकडाऊन सुरु करण्यात आला होता. पुनश्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे वारंवार करत आहेत मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे जिम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विटमधून म्हटलं आहे की, कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करत सरकार याबाबत निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2020
तत्पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील जिम चालक भेटले होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिम सुरु करा असं सांगत राज ठाकरेंनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलं होतं. आम्ही योग्य ती काळजी घेऊ पण जिम सुरु करण्याची परवानगी सरकारने द्यावी, कारण या जिम व्यवसायावर अनेकांचं पोट अवलंबून आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी जिम चालकांनी केली होती. याबाबत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
जिम सुरु करण्याची खासदार सुप्रिया सुळेंचीही मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जिम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जिम सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत.परंतु आता अनलॉक ची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. pic.twitter.com/cWL9eXGfLr
— Supriya Sule (@supriya_sule) August 19, 2020
गेल्या काही दिवसांपूर्वी जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी जिम मालकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी जिम सुरु करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे बोलणे झाले. त्यांचेही म्हणणे आहे की जिम सुरु झाले पाहिजे. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय, असं राज ठाकरे म्हणाले होते. याचबरोबर, राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती.
जिम सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं दिलं होतं आश्वासन
दोन दिवसांत राज्यात जिम सुरु करणार अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी १४ ऑगस्ट रोजी सांगितले होते. मात्र सप्टेंबर महिना संपत आला असतानाही सरकारची ही घोषणा केवळ कागदावरच सहीविना राहिल्याचं दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून लवकरात लवकर जिम सुरु करा, अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे. आज राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केले होते.