Arun Govil in BJP: ‘रामायण’ सिरियलमध्ये प्रभू राम साकारणारे अभिनेता अरूण गोविल यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:59 IST2021-03-18T17:56:35+5:302021-03-18T17:59:15+5:30
अभिनेता अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे.

Arun Govil in BJP: ‘रामायण’ सिरियलमध्ये प्रभू राम साकारणारे अभिनेता अरूण गोविल यांचा भाजपात प्रवेश
नवी दिल्ली – अलीकडेच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्तीने भाजपात प्रवेश केला होता, त्यापाठोपाठ आता १९९० च्या दशकातील प्रसिद्ध पौराणिक मालिका रामायण यामधील अभिनेता अरूण गोविल(Arun Govil) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका अरूण गोविल यांनी केली होती.
अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह उपस्थित होते. भाजपात सहभागी झाल्यानंतर अरूण गोविल म्हणाले की, सध्याच्या काळात जे आमचं कर्तव्य आहे ते करायला हवं. मला राजकारण याआधी समजत नव्हते, परंतु नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे जेव्हापासून देश सांभाळत आहेत, तेव्हा देशाच्या राजकारणात बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्या मनात जे येतं ते करून मी मोकळा होतो असं त्यांनी सांगितले.
तसेच आता मी देशासाठी योगदान देऊ इच्छितो, त्यासाठी मला एका व्यासपीठाची गरज होती, आणि भाजपापेक्षा चांगलं व्यासपीठ मला मिळालं नाही, पहिल्यांदा मी ममता बॅनर्जी यांना जय श्री राम घोषणा देण्यापासून एलर्जी असल्याचं पाहिलं, जय श्री राम ही फक्त घोषणा नाही असा टोला अरूण गोविल यांनी ममता बॅनर्जींना लगावला. ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरूण गोविल यांचा भाजपा प्रवेश विशेष मानला जातो.
दरम्यान, भाजपामध्ये अरूण गोविल यांना कोणती जबाबदारी देणार हे अद्याप स्पष्ट नाही, भाजपा सदस्य बनल्यानंतर अरूण गोविल विधानसभा निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. परंतु यावर पक्षाकडून अथवा अरूण गोविल यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका पुढे आली नाही. अरूण गोविल यांच्यापूर्वी रामायणातील अन्य कलाकारही राजकारणात आले होते, रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्यासह हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंह, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी हेदेखील राजकारणात उतरले होते, दीपिका चिखलिया यांनी भाजपाच्या तिकिटावर दोनदा निवडणूकही लढली आहे.