पोलिस चौकीतच घातला धुडगूस; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण; तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 14:35 IST2021-04-01T14:35:27+5:302021-04-01T14:35:36+5:30
तळवडे येथे रुपीनगर पोलीस चौकीत बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

पोलिस चौकीतच घातला धुडगूस; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण; तरुणाला अटक
पिंपरी : पोलीस चौकीत तरुणाला समजावत असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. रुपीनगर, तळवडे येथे रुपीनगर पोलीस चौकीत बुधवारी (दि. ३१) दुपारी हा प्रकार घडला.
प्रवीण संजय गिरी (वय २८, रा. तळवडे), अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखला आहे. त्या प्रकरणात समज देण्यासाठी त्याला रुपीनगर पोलीस चौकीत बोलावले होते. त्यावेळी पोलीस समजावत असताना आरोपी पोलिसांशी अर्वाच्य भाषेत बोलत होता. त्यामुळे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करून उद्धट वर्तन केले. उपनिरीक्षक इंगळे यांच्या टेबलवरील की बोर्ड फेकून देऊन धक्काबुक्की केली. तसेच उपनिरीक्षक इंगळे यांच्या शर्टची बटणे तोडून शासकीय गणवेशाचे नुकसान करून बुक्क्यांनी मारहाण केली. यात उपनिरीक्षक इंगळे यांच्या हाताच्या बोटांना तसेच खांद्याजवळ दुखापत झाली. पोलीस करत असलेल्या कायदेशीर कारवाईत अडथळा निर्माण केला म्हणून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.