कंपनीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: December 6, 2025 23:34 IST2025-12-06T23:33:32+5:302025-12-06T23:34:07+5:30
सायंकाळी पावणेपाच्या सुमारास ही घटना घडली.

कंपनीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : कंपनीतील भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकला. पिंपरी-चिंचवड महापािलका अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगाराला ढिगाऱ्याखालून काढले. भोसरी एमआयडीसी जे-ब्लॉकमध्ये शनिवारी (दि. ६ डिसेंबर) सायंकाळी पावणेपाच्या सुमारास ही घटना घडली.
मारुती राघोजी भालेराव (३२, राणुबाई मळा चाकण, मूळ रा. वाळकी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीतील जे ब्लाॅकमधील माॅडर्न मेटल वर्क या कंपनीत शनिवारी (दि. ६) जमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी मारुती भालेराव हा ब्रेकरच्या साह्याने खोदकाम करत होता. त्यावेळी शेजारील दर्शनी स्टील या कंपनीची भिंत कोसळून मारुती भालेराव दबला गेला. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या नेहरूनगर, भोसरी व पिंपरी अग्निशमन केंद्रांमधून पाच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने माती हटवून कामगार मारुती भालेराव याला बाहेर काढण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल कले असता डाॅक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.