पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला अडवले. तक्रार मागे घे म्हणून दमदाटी करत मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास आझाद चौक निगडी येथे घडली. अनिता नवनाथ गायकवाड (वय ५२, रा, अंकुश चौक निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा क्षीरसागर, राहूल धोत्रे, कैलास विटकर, रुपेश क्षीरसागर, मयुर धोत्रे, शुभम क्षीरसागर, राणी कांबळे, कविता धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता गायकवाड यांनी बाबा क्षीरसागर आणि रेखा कांबळे यांच्याविरोधात यमुनानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून त्या मुलीसोबत पायी घरी जात होत्या. अनिता आझाद चौकामध्ये आल्या असता आरोपी रिक्षामधून आले. त्यांनी बेकायदा जमाव जमवून अनिता यांना तक्रार मागे घे म्हणत शिवीगाळ केली. तसेच अनिता यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्यांनी, दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अनिता जखमी झाल्या. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
....तक्रार मागे घेण्यावरून टोळक्याकडून महिलेला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 17:10 IST