रावेत : विधानसभा निवडणुकीत महायुतीला शहरात चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर महायुतीकडून पालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे महायुतीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर भाजपा-महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटत आहे. ओबीसी आरक्षणासह अनेक विषयांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. लोकसभेवेळी महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इच्छुक व माजी नगरसेवकांनी यानिमित्ताने प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला.पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नमहापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारसंघामध्ये संपर्क वाढविला आहे. निवडणुका कधी जाहीर होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? इच्छुकांचे लक्ष:महापालिका निवडणुकीची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:51 IST