पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार? महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 7, 2025 16:57 IST2025-05-07T16:56:39+5:302025-05-07T16:57:22+5:30

महायुती आणि महाआघाडी की सगळेच स्वबळावर लढणार?; शहरावरील वर्चस्वासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

Whose flag will be hoisted over Pimpri-Chinchwad? The trumpet of the municipal elections will sound soon. | पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार? महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार

पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार? महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहेत. पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार, याची शहरात उत्सुकता असून, भाजपने मंडलाध्यक्षांच्या निवडी करून तयारीचे एक पाऊल पुढे टाकले आहे, तर इतर पक्षही पदाधिकारी निवडीवर भर देत आहेत. निवडणुकांसाठी महायुती आणि महाआघाडी होणार की सगळेच स्वबळावर लढणार, याकडे इच्छुकांचे लक्ष आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने बाजी मारत सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपचे ७८ नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादीचे ३५, शिंदेसेनेचे नऊ, मनसेचा एक व पाच अपक्ष सदस्य होते. त्यावेळी १२८ जागांसाठी ७७४ उमेदवार रिंगणात होते. भाजपने राष्ट्रवादीला धूळ चारत एकहाती वर्चस्व मिळवले होते. त्यानंतरच्या २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे वगळता शहर आणि परिसरात महायुतीचेच खासदार व आमदार निवडून आले होते. २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार, हे चार महिन्यांत दिसणार आहे.

 
सध्याचे पक्षीय बलाबल

पिंपरी-चिंचवड शहर मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले आहे. मावळमध्ये शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे, तर शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ असून, दोन भाजपचे आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत. शहरात विधान परिषदेचे दोन आमदार असून, दोघेही भाजपचेच आहेत. शहरात भाजपकडे चार आमदारांकडे, तर अजित पवार गटाकडे एका आमदाराचे बळ आहे. त्यावरून सध्यातरी कागदावर महायुतीचे आणि त्यातही भाजपाचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे.
 

भाजप आणि राष्ट्रवादीचा स्वतंत्र लढण्यावर भर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन्ही प्रबळ आहेत. मात्र, दोन्ही गटात ऐक्य नाही. महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवली जाणार असल्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. ‘भाजप’चे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनीही सर्व जागांवर भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. महायुतीतील हे पक्ष स्वबळावर लढणार की स्वतंत्र लढणार, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
 
चार सदस्यीय पद्धतीला राष्ट्रवादीचा विरोध

महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ मध्ये भाजपने सत्ता ताब्यात घेतली. तत्कालीन फडणवीस सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेतल्याने भाजप विजयी झाल्याचा मतप्रवाह आजही कायम आहे. मात्र, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचा चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यास विरोध होता.

Web Title: Whose flag will be hoisted over Pimpri-Chinchwad? The trumpet of the municipal elections will sound soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.