सव्वाशे एकराची सुपारी कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 01:39 IST2016-01-26T01:39:26+5:302016-01-26T01:39:26+5:30
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापरात असलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय

सव्वाशे एकराची सुपारी कोणाची?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापरात असलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय सोमवारच्या सर्वसाधारण सभेत गाजला. हा विषय सभेपुढे व्यवस्थित न मांडल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. १२५ एकर क्षेत्र रहिवासी करण्यासाठी कोण प्रयत्नशील आहे, यासाठी सुपारी देणारा कोण, असा आरोपही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केला.
विषय संदिग्ध असल्याने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांत जुंपली. गोंधळ असल्याने हा विषय मागे घेऊन सभेपुढे नव्याने सादर करावा, असा आदेश महापौरांनी दिला. तहकूब सभा १० फेब्रुवारीला होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेत शासन प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापर विभागात दर्शविलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्राची उपलब्धता होण्यासाठी व सुनियोजित विकास होण्यासाठी रहिवास विभागात समावेशासाठी महापालिकेने कलम ३७ चा प्रस्ताव कार्यान्वित करून शासनास सादर करावा, असे निर्देश पालिकेस दिले होते. त्यानुसार हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता.
१८ जुलैला आलेल्या शासनादेशानुसार २० नोव्हेंबरच्या सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. आजच्या सभेपुढे हा विषय आला. मुद्द्यांवर चर्चा झाली. राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘हा विषय काय आहे, याचा सविस्तर खुलासा करावा. या प्रस्तावात नवीन गावांतील नदीकाठच्या क्षेत्राचा विचार केला आहे. जुन्या गावांचा विचार होणार का, याबाबत उपसूचना घ्यावी.’’
सुरेश म्हेत्रे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांत नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर हरित पट्टा आहे. या नवीन दुरुस्तीने नव्या आणि जुन्या गावांचाही विचार केला जावा.’’
‘‘विकास आराखड्यात चुका झाल्या. त्यातील पूररेषा ही चूक आहे. मंजुरी देताना विचार व्हायला हवा. जुन्या-नवीन गावांचा विचार व्हावा,’’ असे दत्ता साने म्हणाले. संजय काटे, स्वाती कलाटे यांनीही उपसूचना दिली.
योगेश बहल म्हणाले, ‘‘विषयाबाबत संदिग्धता आहे. या विषयाचा पूर्ण खुलासा करावा. नाला, सर्व्हे क्रमांक यामुळे गुंतागुंत वाढली आहे.’’ नितीन काळजे, नाना लोंढे, राहुल जाधव यांनीही चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)