कामशेत : केंद्राच्या पुरातत्त्व खात्यांतर्गत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर तालुक्यातील इतर किल्ल्यांपेक्षा जास्त पुरातन अवशेष आजही शिल्लक असून, किल्ल्यावरील जंगलात तीन मजली इमारत, भिंतींचे अवशेष, पायºया, त्याखाली असणारे शौचकूप, तटबंदी, दोन तोफा व एक तुटलेली तोफ आदी महत्त्वाचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. मात्र, पुरातत्त्व खाते व पर्यटकांकडूनही हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. किल्ल्याची बुलंद तटबंदी ठिकठिकाणी ढासळू लागली असून, वास्तूची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊ लागली आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख तीन वाटा असून, आजपर्यंत पर्यटकांनाही माहिती नसलेल्या दोन ते तीन चारमजली इमारती किल्ल्यावरील जंगलात दडून बसल्या आहेत. यातील एका वाड्याच्या भिंती आजही सुस्थितीत असून, वाड्याच्या वरती जाण्यासाठी दोन बाजूंनी असलेल्या पायºया, त्याखाली शौचकूप, पाण्याचे दोन टाके, भिंतीत असलेल्या देवळ्या, परसदार आदी अवशेष शिल्लक आहेत. मात्र, हे सर्व किल्ल्यावरील जंगलात असल्याने पर्यटकांच्या नजरेस पडत नाही. या पद्धतीच्या अजून दोन वाड्यांचे अवशेष येथे असल्याचे दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाºया संस्थेचे राज बलशेटवार यांनी सांगितले. तालुक्यातील इतर किल्ल्यांपेक्षा जास्त पाण्याच्या टाक्या असणारा व बुलंद तटबंदी असणारा हा एकमेव किल्ला असून, इतिहासात हा किल्ला दुर्लक्षित राहिला. मागील काही वर्षांमध्ये या किल्ल्याच्या काही दरवाजे, बुरुज व लांबसडक असलेली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळून किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली आहे.मळवलीमध्ये गेल्यास समोर लोहगड दिसतो. मात्र, डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. याला संबळगड, तसेच इसागड म्हणूनही संबोधले गेले आहे. किल्ल्यावर दगडावर कोरलेल्या मारुतीच्या दोन मूर्ती आहेत. बाजूलाच दोन गुहा आहेत. त्यात ३० ते ४० जण राहू शकतात. मात्र पावसाळ्यात त्यांत पाणी साचते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे. गडाच्या पठारावर अनेक विरगळी अस्ताव्यस्त अवस्थेत आहेत. या किल्ल्यावर सुस्थितीत असलेले दारूगोळा कोठार, गर्द झाडीत पडका राजवाडा, कचेरीचे अवशेष, बांधीव सुस्थितीत असलेली विहीर, शंकराचे पुरातन मंदिर, दुहेरी तटबंदीचा बुरुज, तटबंदीतून बाहेर निघण्यासाठी चोर दरवाजे आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मी शिलालेख असलेला हा पुरातन किल्ला आहे. या किल्ल्यावर ८३ छोटी-मोठी पाण्याची टाकी आहेत. तटबंदीच्या बांधकामासाठी व इमारतींच्या कामासाठी लागणारा दगड पाषाण यातूनच काढण्यात आला होता. त्यामुळेच या किल्ल्यावर इमारतींचे अनेक अवशेष आढळत आहेत.जंगलात हरविलेले तीन वाडे१मावळ तालुक्यातील राजमाची, लोहगड व विसापूर हेकिल्ले केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येतात. कोरीगड हा किल्ला राज्य पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येतो, तर तिकोना, तुंग, घनगड, मोरगिरी हे किल्ले असंरक्षित म्हणून शासनाने घोषित केले आहेत.२विसापूर किल्ल्याची बुलंद तटबंदी त्याचबरोबर किल्ल्यावरील विस्तृत प्रदेश व ठिकठिकाणी भग्नावस्थेत असलेले इमारतीचे अवशेष, शिवाय जंगलात हरवलेले दोन किंवा तीन वाडे आदी पाहता या किल्ल्यावर तालुक्यातील इतर किल्ल्यांपेक्षा जास्त पुरातन अवशेष शिल्लक असताना, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा किल्ला मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.
विसापूर अद्याप दुर्लक्षितच! ठिकठिकाणी ढासळल्याने झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:30 IST