मावळमध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग; विरोधी पक्षाच्या तक्रारी, आठ तक्रारींचा निपटारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:44 PM2024-03-25T12:44:26+5:302024-03-25T12:44:59+5:30

आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह, नावे झाकण्याचे, तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे....

Violation of code of conduct by BJP in Maval; Complaints of the Opposition, disposal of eight complaints | मावळमध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग; विरोधी पक्षाच्या तक्रारी, आठ तक्रारींचा निपटारा

मावळमध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग; विरोधी पक्षाच्या तक्रारी, आठ तक्रारींचा निपटारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर भाजपचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले असून ते तत्काळ मिटविण्यात यावे, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी तशी तक्रार केली आहे.

आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह, नावे झाकण्याचे, तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर पक्षाचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले आहे. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून, त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.

...अन्यथा आम्हीही भिंती रंगवू

भाजपने जाणूनबुजून शहरभर कमळ चिन्हाचे वॉल पेंटिंग केले असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्हीही खुलेआम भिंती रंगवत आमच्या पक्षाचा आणि चिन्हाचा प्रचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

फ्लेक्स, बॅनर, जाहिरात फलकाबाबत तक्रारी

शहरात बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर, तसेच जाहिरात फलक याबाबत तक्रारी आहेत. आचारसंहिता सुरू झालेल्या दिवसांपासून म्हणजे १६ मार्चपासून पहिल्या चार दिवसांमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात चार, चिंचवड विधानसभा मतदारसंघात तीन तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एक अशा एकूण ८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावर कारवाई केली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

अशी करा तक्रार

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करायची झाल्यास सी-वीजिल पोर्टल, तसेच १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारींची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली.

Web Title: Violation of code of conduct by BJP in Maval; Complaints of the Opposition, disposal of eight complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.