पिंपरी : तीन मित्रांनी मिळून एका मित्राला कपडे काढायला भाग पाडले. त्याला स्वतःच्या प्रायव्हेट पार्टवर झंडू बाम लावण्यास सांगितले. त्याचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. हिंजवडी येथील मारुंजी रोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली.
श्रेयस संजय कवडे (१९, रा. हिंजवडी. मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (२१, रा. हिंजवडी. मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (३५, रा. हडपसर. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण, संशयित श्रेयस आणि ललित हे तिघे ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत. श्रेयसने पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटी मधील फ्लॅट वर बोलावून घेतले. तिथे राम गंभीरे याने पीडित तरुणाला सिगारेट दिली. ती सिगारेट तरुणाकडून खाली पडली. पीडित तरुणाने सिगारेट उचलून ऍशट्रेवर ठेवली. त्यावरून राम गंभीरे याने पीडित तरुणाला मारहाण केली. तरुणाला कपडे काढण्यास सांगितले. झंडू बाम त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावण्यास सांगितले. दरम्यान ललित याने या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. राम गंभीरे याने पीडित तरुणाला ‘तुला कोणाकडे जायचे ते जा. माझ्यावर ५३ केसेस आहेत. माझे कोणी काहीही बिघडू शकत नाही’ अशी धमकी दिली.
तक्रारदार आणि संशयित दोन मुले एकाच महाविद्यालयात शिकतात. तर गंभीरे हा एकाचा नातेवाईक आहे. घटना उघडकीस आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ तिन्ही संशयिताना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड