- नारायण बडगुजरपिंपरी : आधी जमिनीसाठी लुटणारा मुळशी पॅटर्न आपण बघितला आहे. आता मुलींचा छळ करणारा मुळशी पॅटर्न समोर आला आहे. इतका पैसा देऊनही मोठमोठ्या श्रीमंत घरातील लोक सुनांचा छळ कसा करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करून भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक प्रमुख तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला.
मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी शशिकांत हगवणे हिने १६ मे राेजी आत्महत्या केली. या घटनेनंतर तृप्ती देसाई यांनी गुरुवारी वाकड येथे वैष्णवी हिच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी देसाई म्हणाल्या, वैष्णवीच्या आईने सांगितले की, हुंड्याची मागणी करून वैष्णवीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले. आम्ही तिला फोडाप्रमाणे जपले. तिला कधी हात लावला नाही. तिच्या अंगावर व्रण बघितल्यानंतर प्रचंड संताप आला. लोक एवढ्या क्रूर पद्धतीने कसे वागू शकतात? हुंडा बंदीचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे तरीही हुंडाबळीची प्रकरणे थांबलेली नाहीत.
सरेंडर होण्यापूर्वी अटक करावी
वैष्णवीचा सासरा आणि दीर या दोघांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. त्यांनी सरेंडर करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक करावी. कारण अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड हा सरेंडर झाला होता. असेच जर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सरेंडर झाले तर त्यांना राजकीय आश्रय आहे. त्यामुळे राजेंद्र हगवणेची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.
पोलिसांनी धिंड काढावी
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला अटक करून त्यांची गुंडांप्रमाणे पोलिसांनी धिंड काढावी. त्यामुळे अशी क्रुरता करण्याची हिम्मत यापुढे कोणीही करणार नाही. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात गेले पाहिजे. ताबडतोब निकाल आला पाहिजे. हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये लवकर निकाल लागला पाहिजे. संसार करायचा असल्याने मुली सासरच्यांकडून होणारा छळ सहन करत असतात.