'महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर…' उपसभापती गोऱ्हे यांचे भाष्य
By नारायण बडगुजर | Updated: May 24, 2025 19:16 IST2025-05-24T19:11:39+5:302025-05-24T19:16:12+5:30
या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

'महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर…' उपसभापती गोऱ्हे यांचे भाष्य
पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी राहू नये. संशयितांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सारिका पवार, कांता पांढरे, सुदर्शन त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, स्त्री आधार केंद्र पुणेच्या अनिता शिंदे आदी उपस्थित होते. पोलिसांकडून या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून, साक्षी-पुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगण्यात आले. हुंडाबळीची शिकार झालेल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी काही केले नाही, हे म्हणण्यापेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी जगताप हिची भेट घेऊन तिलादेखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. तसेच या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर...
उपसभापती गोऱ्हे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. महिला आयोगाने मयुरी जगताप प्रकरणामध्ये पोलिसांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालविण्याचा सल्ला दिला असता, तर आतापर्यंत तिला प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. मात्र, राज्य महिला आयोगाचे काय चूक आणि बरोबर हे ‘ट्रायल बाय मीडिया’ होऊ नये. मात्र, ते जे काही काम करत आहेत. त्यात अजून काही तज्ज्ञ व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात. विजया रहाटकर यांनी ते केले होते. महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे. तसेच अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.